Saturday, July 20, 2024

जैसा ज्याचा भाव, तैसा त्याचा देव!

जैसा ज्याचा भाव, तैसा त्याचा देव!ध्रु.

भाव शुद्ध व्हावा
स्वार्थ लुप्त व्हावा
विशुद्ध प्रेमाची व्हावी देव घेव!१

शुद्ध भाव ज्याचा
राम हो तयाचा
अशा साधकासी नुरते संसाराचे भेव!२

राम हाच नाम
नाम हेच राम
आत्मसुख धावुनि येते द्यावयास खेव!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ४९ (१८ फेब्रुवारी) वर आधारित काव्य.

नामाविषयी शुद्ध भाव व दृढनिश्चय आवश्यक आहे. एकाच मातीचा जसा गणपती, बाहुले किंवा मडके होते त्याप्रमाणे ईश्वरही आपल्या भावनेप्रमाणे होतो. म्हणूनच आपला भाव नेहमी शुद्ध, निस्वार्थी असावा. भाव शुद्ध कसा होईल हे पाहावे. नाम श्रद्धेने व शुद्ध भावाने घ्यावे म्हणजे मनात शंका येत नाहीत. भगवंत आणि त्याचे नाव ही एकरूपच असल्यामुळे त्या दोघांचे आड काहीच येऊ शकत नाही. नामाशिवाय दुसरे सत्यच नाही अशी दृढभावना झाली पाहिजे. नामासारखे सोपे साधन नाही विषयाच्या ध्यासापासून सुख नाही असे वाटू लागले म्हणजे नामात गोडी येते.

No comments:

Post a Comment