शेतालागी कुंपण तैसा परमार्थासी संसार -
इतुके घ्या ध्यानी सार!ध्रु.
जागृत असणे निशिदिनी
रहावेच अनुसंधानी
असे न होवो असावधक्षणी कुंपण शेता खाणार!१
भ्रमे वागता खुंटे प्रगती
यत्नांची होते माती
नाम जपावे प्राणपणाने ते परतीरा नेणार!२
संग कुणाचा? नेम नसे
स्वतःस जपणे सूत्र असे
मीपण मारुनि स्वये उरावे असली अवघड शिकार!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १२३ (२ मे) वर आधारित काव्य.
शेताचे रक्षण व्हावे म्हणून जसे कुंपण, तसा संसार हा परमार्थाला कुंपण म्हणून असावा. कुंपणालाच जर खतपाणी मिळाले तर कुंपणच शेत खाऊन टाकते. तसे न होईल इतक्या बेताने संसाराला खतपाणी घालावे.
परमार्थ ही कठीण शिकारच आहे. शिकार अशी मारली पाहिजे, की आपल्या मीपणाला मारून आपण जिवंत राहिले पाहिजे, आणि आपल्याला नको तेवढेच गळून पडले पाहिजे.
No comments:
Post a Comment