जी जी धडपड सुखार्थ चाले दुःखच ती देते
करावे काय न हे कळते!ध्रु.
करावे काय न हे कळते!ध्रु.
प्रपंचात जी दिसे चिकाटी
का न दिसतसे ती परमार्थी?
नश्वर जे ते भुरळ घालुनी विटंबना मांडते!१
जरी भोगिले विलास नाना
समाधान या जिवा मिळेना -
सामंजस्या चित्त अज्ञ हे किमर्थ ना वरिते?२
अशाश्वताचा मोह गळू दे
जे शाश्वत ते प्रिय वाटू दे
अंतरंग नच जाणुनि मन का बहिरंगा भुलते?३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ६७ (७ मार्च) वर आधारित काव्य.
प्रपंचात सुख मिळावे म्हणून आपण जी चिकाटी धरतो तिच्या एक चतुर्थांश चिकाटी जरी भगवंतासाठी आपण धरली तरी आपले काम भागेल. तात्पुरत्या सुखासाठी आपण आज धडपडत आहोत, त्यापासून दुःखच पदरात पडते. म्हणून तसे न करता चिरकाल टिकणाऱ्या सुखासाठी आपण काहीतरी साधन करावे.
No comments:
Post a Comment