Wednesday, July 17, 2024

का हुरळावे? हिंपुटि व्हावे?

फळ जर नाही अपुल्या हाती 
मी कर्ता तरि का समजावे? 
का हुरळावे? हिंपुटि व्हावे?ध्रु.

मी मी जो नर व्यर्थ बरळतो 
दुःखाचा तो धनीच होतो 
कर्तृत्वाचा भार वाहुनी, ओझ्याचे का गाढव व्हावे?१ 

देहबंधने पूर्ण जखडला 
तो जगती कधि सुखी जाहला?
तटबंदी ती विध्वंसुनिया, विशाल विश्वा का न पहावे?२ 

स्मरण असावे भगवंताचे 
नुरेल नावहि मग विषयाचे 
विवेकबंधू असता जवळी का न तयाचे लव ऐकावे?३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ९१ (३१ मार्च) वर आधारित काव्य.

कर्ता मी नाही म्हटले म्हणजे प्रपंचातील अडचणी सुटू लागतात.
ज्याचे फळ आपल्या हाती नसते ते कर्म मी केले असे म्हणण्यात काय पुरुषार्थ आहे? कर्ता मी नाही हे समजले म्हणजे सर्व साधते. नको असलेले नामस्मरण बळजबरीने करावे, म्हणजे हवे असलेले विषय जातात. जर आपल्याला विवेकाने सुखी राहता आले नाही तर आपल्याला सुख कधीच मिळणार नाही. कर्तव्य म्हणून प्रामाणिकपणाने आपण प्रपंच करावा त्यामध्ये भगवंताला विसरू नये व अनुसंधान कमी होऊ देऊ नये.

No comments:

Post a Comment