प्रपंच सुख नच देतो, कळता, हाव कमी होते!ध्रु
प्रारब्धे हा प्रपंच आला
कर्तव्याचा भाग मानला
लोभ सरतसे थोडा थोडा, आसक्ती सुटते!१
समाधान भगवंतापाशी
तिथे तिथे सौख्याच्या राशी
राम एक मानता आपुला वाट दिसू लागते!२
अज्ञानाची काजळरात
मावळताक्षणि फुटे पहाट
सोऽहं, सोऽहं वायुलहर ही शीतलता देते ! ३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ८५ (२५ मार्च) वर आधारित काव्य.
प्रपंच आम्हाला सुख देईल ही आमची कल्पनाच नाहीशी झाली पाहिजे; म्हणजे प्रपंचाची हावही कमी होईल व नंतर कर्तव्यापुरतेच आम्ही प्रपंचात राहू. प्रारब्धाने प्रपंच आला आहे तो कर्तव्यकर्म म्हणून करीत जा, पण त्यात सुख मिळणार आहे या कल्पनेने तो करू नका. तसेच प्रपंचात समाधान हा फायदा आहे तो जर मिळत नसेल तर प्रपंचाचा लोभ धरण्यात काय फायदा आहे? कैदेतील माणसाला 'मी सुखी आहे ' असे कधी वाटेल का? तशी प्रपंची माणसाची अवस्था आहे. खरोखर प्रपंचात समाधान, आनंद मिळत नाही हे अगदी सर्वांना कळते, परंतु शहरातील लोक केवळ अभिमानामुळे व खेड्यातील लोक अज्ञानामुळे जसे वागावयास पाहिजे तसे वागत नाहीत. या प्रपंचात राहून सुद्धा भगवंताचे प्रेम व समाधान आम्हास कसे मिळवता येईल, याचा आपण आधी विचार करायला पाहिजे. आहे त्या अवस्थेमध्ये आपले समाधान टिकत नाही आणि पाहिजे ती वस्तू मिळाली तरी आपण पूर्ण सुखी होत नाही.
No comments:
Post a Comment