नाम हाच भाला, रोखण्या विषयाचा घाला!ध्रु.
नामावर विश्वास ठेवता
नाम सदोदित कंठी धरता
नामि राहता, नामि रंगता रामरूप झाला!१
सत्संगति नामेच लाभते
नामोच्चारे भवभय पळते
नाम बोलता, नाम ऐकता, प्रिय व्हा रामाला!२
काळ काहिही करू धजेना
विषयसर्पही डंख करेना
नाम गर्जता, डंका पिटता राम मधुर हसला!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १८१ (२९ जून) वर आधारित काव्य
परमार्थाचा अनुभव वाढीस लागण्याकरताच पुण्यतिथी साजरी करावी. पुण्यतिथी कशी साजरी कराल? या दिवशी जो नेम कराल तो सतत टिकण्यासारखा असतो. म्हणून आजपासून नामाशिवाय बोलायचे नाही असे आधी ठरवा. नामात राहण्याचा प्रयत्न करा. नामाचा उच्चार कंठी ठेवा, म्हणजे विषयाचा घाला होणार नाही. आता कलि मातत चाललेला आहे; त्याचा घाला चुकविणे असेल तर नामावर विश्वास ठेवा. कोणी काहीही सांगितले तरी नाम सोडू नका. तुम्ही नामाची कास घट्ट धरलीत म्हणजे काळ काही करू शकणार नाही. नामस्मरण सतत केल्याने आज ना उद्या भगवंताचे प्रेम येईलच येईल. विषयांची उर्मी हे मायेचे स्मरण होय आणि नामाचे स्मरण हे भगवंताचे स्मरण होय. नामाच्या मागे भगवंताचे अस्तित्व आहे, म्हणून नामात सत्संगतीही आहे. मायेने आपल्यावर विषयास्र सोडले की आपण त्यावर उलट भगवंताच्या नामाचे अस्त्र सोडावे, म्हणजे विषय आपोआपच नाहीसा होईल.
No comments:
Post a Comment