Friday, October 18, 2024

तेव्हा मानव खरोखरी तो साक्षर होईल!

ओवी ऐकणे, ओवी वाचणे जेव्हा साधेल
तेव्हा मानव खरोखरी तो साक्षर होईल!ध्रु.

वाचन आपले आपल्या पुरते 
हळुहळु पोथी कळू लागते 
जे जे कळले हातुन सगळे माउली करवेल!१ 

ही तर संवादाची भाषा
सामंजस्याचीच मनीषा 
विश्वाचे आंगण मग भक्ता आंदण लाभेल!२ 

सद्‌गुरु पुढती बसले असती 
ते तर सगळे वदवून घेती 
उषःप्रभा मग हलके हलके पसरू लागेल!३

प्रपंच परमार्थाची शाळा 
जो तो नकळत शिकू लागला
मनपाटीवर प्रेमाक्षर शिशु गिरवू लागेल!४ 

सोपी सोपी अंकलिपी ही 
घ्यावी शिकुनी जन लवलाही 
ना तर चुटपुट मना शेवटी लागुन राहील!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१५ जानेवारी २००४ गुरुवार

No comments:

Post a Comment