पन्हाळा गडावर सिद्दी जोहरच्या वेढ्यात छत्रपती शिवाजी महाराज अडकले होते तेव्हा इंग्रजांनी सिद्दी जोहरला तोफा, दारू-गोळा बंदुका आणि गोलंदाज पुरवून मदत केली होती. जे इंग्रज काही महिन्यापूर्वी व्यापाराची परवानगी मागत होते तेच आपल्यावर उलटले. पण महाराज पन्हाळा गडावरून सिद्दी जोहर च्या वेढ्यातुन सही सलामत निसटले आणि काही महिन्यातच इंग्रजांची राजापूरची वखार खणुन काढली आणि काही इंग्रज अधिकाऱ्यांना कैद करून ठेवले होते... त्या प्रसंगावर आधारित काव्य
आत्ता बसला हादरा
तोफ डागली पन्हाळ्यावरी, आत्ता बसला हादरा!
प्रतिशोधाते शिवनेत्रांतून आयसगोळा सुटला!ध्रु.
सूड घेतल्याविना न शांती
टोपिकरांची स्वार्थी जाती
सापापरि हे सहज उलटती
हुकूम दिधला लष्करास झणि दगलबाज हे कैद करा!१
कुदळी लावा, खणा वखारी
जगा आगळे हे व्यापारी
वैऱ्याहुनही घातक वैरी
जेरबंद या करून यांचा सुयोग्य गौरव करा, करा!२
आजवरी जी पापे केली
हिशेब त्याचा द्याच या स्थली
जप्ती यांते अता न टळली
तोंड दावण्या या नच हिंमत, बोलायाते धैर्य जरा!३
मिजास यांची पुरी उतरणे
स्थान तयांचे योग्य दाविणे
कैदच यांच्या नशिबी लिहिणे
परक्या देशी नसते चाळे जन्मखोड करि घात पुरा!४
(चाल) स्वराज्य भांडारी जमू दे सारी संपत्ती
लूट अमीरांची, गरीबा कोणी ना जाचती
शिलंगणातुन या गवसले सुंदरसे मोती
उपऱ्यांचा परि मऱ्हाटदेशी उतरविला तोरा!५
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
No comments:
Post a Comment