॥ श्रीराम समर्थ ॥
गोंदवल्याला यावे, रामा डोळे भरूनि पहावे!
नयनां मिटुनी घ्यावे, नाम गोंदवुनि घ्यावे! ध्रु.
श्वास न जावा नामावाचुन, अशी दक्षता घ्यावी
श्रीरामाचा दास मारुती 'तो मी' खूण पटावी
प्रत्येकच तन श्रीरामाचे सुंदर मंदिर व्हावे!१
माझ्या गुरुचे नाव तुकाई शिकवी सोसायाला
कठोर वरवर आतुन प्रेमळ अनुभव ऐसा आला
गावे भावे रामनाम ते तसे गाववुनि घ्यावे!२
अन्नदान बहु रुचते रामा नामाचा मज छंद
भ्रमर मनाचा सेवतसे नित भजनाचा मकरंद
मना उलटता नाम जाहले अहोभाग्य समजावे!३
राघव माझ्यासंगे कैसा नित्यच हासे खेळे
वियोगवेला येता त्याच्या नयनी आसू आले
अमूर्त भगवंताला आपण नामाने बांधावे!४
'नामासाठी मी अवतरलो' पहा मला नामात
हनुमंताशी बोला जनहो मनात जे जे येत
मजला कळते-रामराज्य ते प्रपंचात आणावे!५
गोंधळ नामाचा प्रेमाचा लोपावे 'मी माझे'
रामावरती राहो निष्ठा त्याची सत्ता गाजे
हनुमंताने मन पवनाला नामे जोडुन द्यावे!६
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
८/१२/१९९४ चंपाषष्ठी (मार्गशीर्ष)
No comments:
Post a Comment