सिंधुस्थाना स्मरता उसळे हृदी भक्तिसिंधु -
तोच खरा हिंदू!ध्रु.
इथे जन्मतो, इथे वाढतो
राष्ट्रजीवनी तो समरसतो
प्रदेश धर्म नि वंश त्रयी ने गंगाजलि बिंदू! १
सिंधूपासुनि सुरू जाहली
जी सिंधू ते जाउनि मिळली
ती भारतभू जया पुण्यभू - श्रद्धेचा सिंधू!२
जे जे रुचले स्वीकृत केले
संस्करणे उन्नतीस नेले
हिंदु जाति ज्या जीवनातला आद्य मानबिंदू!३
संस्कारांचा थोर वारसा
लाभला असे जया मानसा
तो तो मानव पूर्ण सुसंस्कृत धैर्यशील बंधू!४
एकच आशा एक भावना
विकल्पास मनि वाव उरेना
परंपरा जो पुरी जाणतो त्या प्रेमे वंदू! ५
"हिंदु" शब्द राष्ट्राचा वाचक
तो उद्बोधक, तो तर प्रेरक
समान संस्कृति बंधन बघते ज्या प्रेमे बांधू!६
विजिगीषु अन् ज्ञानोपासक
कर्मयोगि अन् दीनोद्धारक
जागृत जो नित देशरक्षणी त्या मानू हिंदु!७
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित काव्यामधील एक काव्य.
No comments:
Post a Comment