Saturday, October 5, 2024

भगवंत नांदतो निर्हेतुक नामात!

हे शब्द कोरुनी ठेव अंतरंगात 
भगवंत नांदतो निर्हेतुक नामात!ध्रु.

कर्मास हेतुचा स्पर्श नसो
हृदि भगवंताचा ध्यास असो 
उद्धार कराया सिद्ध प्रभूचा हात!१

जरी विषय लाभ झालेला 
परमात्मा सुदूर गेला -
इतिहास बोलका ठेव सदा ध्यानात!२

सद्वर्तन, निष्ठा श्रीरामी
मग समाधान अंतर्यामी 
भगवंत गुंततो निस्वार्थी प्रेमात!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
 
गोंदवलेकर महाराज यांची चरित्र मधील प्रवचन क्रमांक ५३ (२२ फेब्रुवारी) वर आधारित काव्य.

खरोखर आज आपल्याला आपले अंतरंग ओळखण्याची खरी गरज आहे. सत्कर्म असो किंवा दुष्कर्म असो हेतूवर सर्व काही आहे. पुष्कळ पुण्यकर्मे केली, आणि काही तरी विषयाचा हेतु मनात धरला, तर काय उपयोग? मन जोपर्यंत तेथे नाही तोपर्यंत राम नाही भेटणार. मनाला भगवंताची तळमळ लागली तरच त्याचा उपयोग.  निर्हेतुकात भगवंत असतो, म्हणून आपली कर्मे तशी करावीत. आपण विषयाकडे दृष्टी ठेवून कर्मे करतो व भगवंत भेटत नाही म्हणून दुःखी होतो, याला काय करावे? उत्कट प्रेमामुळे भगवंताचा ध्यास लागतो. भगवंताला पाहून "तू भेटलास आता मला काही नको," अशी वृत्ती झाली पाहिजे, तरच मीपणा मरेल. भगवंताचा हात तर पुढे आहेच; आपलाच हात त्याच्यापर्यंत पोहोचत नाही. सुख हे कोठून उत्पन्न करावयाचे नसून ते आपल्या वृत्तीमध्येच असते. जसा "मी" भगवंताचा आहे तसे "सर्वजण" भगवंताचे आहेत. म्हणून भगवंतावर प्रेम केले की सर्व जगावर प्रेम बसेल. लोकांना सांगणे जेथे बंद होते तेथेच काही कृतीत येऊ लागेल. कोणत्याही परिस्थितीत जरी नाम घेतले तरी ते आपल्याला तारकच ठरेल यात काहीच शंका नाही.

No comments:

Post a Comment