Wednesday, October 16, 2024

भगवंताचे नाम घोकणे, भगवंताचे नाम!

भगवंताचे नाम घोकणे, भगवंताचे नाम!ध्रु.

कार्यनाश जगि चिंता करते
कर्तव्याचा विसर पाडते 
मनी जागता भाव ठेवणे "कर्ता प्रभु श्रीराम"!१ 

व्यवहारी सुख कर्तव्याने 
परमार्थी सुख दृढ निष्ठेने 
देव जोडणे ध्येय एकले, वाटचाल अविराम!२ 

मीपण नडते, काम नासते 
शरणबुद्धि एकली तारते
अभिमानासी दूर कराया आळविणे श्रीराम!३ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १६६ (१४ जून) वर आधारित काव्य.

अभिमानाने कोणतेही कृत्य केले तर ते नाही भगवंताला पोचत. मीपणाने केलेले काम नाही उपयोगी पडत. शरणबुद्धीने केलेले काम हाच खरा धर्म. मी भगवंताच्या हातचे बाहुले आहे असे समजावे. राम कर्ता असे म्हणावे. काळजीने कार्याचा नाश होतो आणि कर्तव्याचा विसर पडतो. व्यवहारात सौख्य कर्तव्याने मिळते, तसे परमार्थात सौख्य निष्ठेने मिळते. परमार्थ करणाऱ्याने कोणाचेही अंत:करण दुखवू नये.  पैसा नसून अडते व तो असून नडते, अशी आपली परिस्थिती आहे. मी कर्ता आहे ही प्रपंचातली पहिली पायरी, तर राम कर्ता आहे ही परमार्थातील पहिली पायरी. जो सद्हेतूने कर्म करतो तोच खरा परमार्थी समजावा.

No comments:

Post a Comment