सर्वसत्ताधीश जरी भगवंत
अडकतो सहज नामजालकात!ध्रु.
अडकतो सहज नामजालकात!ध्रु.
भ्रमर कठीण तुळइ पोखरी
कमळात झाला बंदिवान परी
तैसा राम आहे नामाचा अंकित!१
नाम घेइ जो, जो, रामाचाच होतो
तयापाठि राम शोध घेत येतो
नाम जपण्यात सामर्थ्य अनंत!२
बुद्धि पालटावी म्हणुनि नाम घ्यावे
विषय विस्मरावा म्हणुनि नाम घ्यावे
नामाची धरावी अखंड संगत!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ३३ (२ फेब्रुवारी) वर आधारित काव्य.
भगवंत सर्वसत्ताधीश खरा, पण एका बाबतीत तो अगदी लुळा पांगळा होतो. नामरूपी जाळ्यात तो सहज अडकतो. भगवंताचे नाव जो घेतो त्याचा शोध घेत भगवंत त्या इसमाचे मागोमाग जातो. म्हणजेच जो नाम घेतो त्याचे जवळ भगवंत असतो. दृश्यामध्ये असणारी भगवंताची खूण म्हणजे नाम होय. नाम म्हणजेच भगवंत होय. सद्बुद्धि उत्पन्न करण्याचे सामर्थ्य फक्त भगवंताच्या नामातच आहे.
No comments:
Post a Comment