Saturday, July 18, 2026

घडेल कैसी गुरुसेवा?

देहबुद्धि जोवरी राहते, घडेल कैसी गुरुसेवा?ध्रु. 

'मी देही' ही प्रबल भावना 
हातुनि काही घडू देइना
जाळत परि चिंता वणवा!१

संशय निरसन घडत न जोवर 
भेटत नाही तारक ईश्वर 
आक्रंदत मन "वाचवा"!२

साक्षित्वाने कसे रहावे? 
संतापासुनि शिकून घ्यावे
सुखवील नामजल शिडकावा!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(गोंदवलेकर महाराज प्रवचन २००, १८ जुलै वर आधारित काव्य)

देहबुद्धि नाहीशी झाल्याशिवाय पूर्ण गुरु सेवा घडतच नाही आणि गुरुसेवेमध्ये देह झिजवल्यावाचून देहबुद्धि पूर्ण नष्ट होत नाही. मी देही आहे ही भावना आहे, तोपर्यंत काळजी राहणारच. परमेश्वराचा आधार वाटत नाही तोवर काळजीही मनाला सोडीत नाही. संत आपल्यावर येणारी संकटे नाहीशी करीत नाहीत तर त्या संकटांची भीती नाहीशी करतात. जगाला जिंकणे एकमेव सोपे पण स्वतःला जिंकणे कठीण आहे. संत साक्षित्वाने जगात राहतात व साक्षित्वाने राहणाऱ्यास दुःखाची बाधा होत नाही. संतांच्या आज्ञेचे एकनिष्ठपणाने जो पालन करतो त्याचे संशय आपोआप दूर होतात. जोवर संशय आहे तोवर असमाधान आहे. जशी स्थिति येईल त्या स्थितीत समाधानात राहावे. कचेरीचे विचार आपल्याबरोबर घरी आणू नयेत, ते तेथेच ठेवावेत. घरातील वातावरण शुद्ध व नि:संशयाचे असावे.

No comments:

Post a Comment