Friday, July 15, 2022

श्रीदासबोध वाचायाचा



श्रीदासबोध वाचायाचा राघवासाठी
अभ्यासाने सहजसमाधि साधण्यासाठी!ध्रु.

व्यवहाराला परमार्थाने भरून टाकावे
निर्मळपण आतले जगाला ओळखता यावे
करुणासागर श्रीरामाच्या लटिक्या ना गोष्टी!१

बसल्या ठायी नयन मिटावे आत डोकवावे
पवनमनांना नामासंगे वर ओढुन घ्यावे
गगनांतरि जो निळा सावळा तो तर जगजेठी!२

शिवथरघळ प्रत्येक अंतरी ग्रंथराज ऐका
सज्जन मन मग बघा धरतसे अचूकसा ठेका
इहपरलोका घ्या घ्या साधुन साधा हातोटी!३

नामाची द्या जोड कृतीला यत्न राम आहे
कर्ता रामच फलहि तयाला पुरते पटताहे
भवसागर हा पहा लीलया भाविक तरताती!४

समर्थसेवक आपण सारे कोण वक्र पाहे
दासाचा अभिमानी स्वामी सर्वथैव आहे
रघुनाथाच्या जयजयकारे धन्य धन्य धरती!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१३/१४.०६.२००४

No comments:

Post a Comment