Tuesday, July 19, 2022

रणनवऱ्याची जात आमुची



रणनवऱ्याची जात आमुची, वारस आम्ही विजयाचे!
वारस आम्ही विजयाचे!ध्रु.

अमुची सेना दौडत राही
अम्हा विसावा ठावा नाही
जावे तेथे मिळे धवल यश, निशाण नभि डोलायाचे!१

शिंगे नौबति वाजु लागता
पराक्रमाते बाहु स्फुरता
जय भवानी! हर हर गर्जन कडेपठारी घुमायचे!२

पराक्रमाने, उत्साहाने
आनंदाने, आकांक्षेने
झपाटलेले गडी मावळे अम्ही लाडके शिवबाचे!३

एक एक गडि गडासारखा
गनीम वाटे किड्यासारखा
अवसानाने झेप घ्यावया बंधु शोभतो चित्त्याचे!४

नवी चढाई, नवे संक्रमण
रणचंडीचे मिळे निमंत्रण
नौबति झडती, हय फुरफुरती - वेड
अम्हाला दौडीचे!५

गंगा येथिल स्वतंत्र झाल्या
शिवास पाहुन गाली हसल्या
खळाळणारे पाणी त्यांचे गीत गातसे विजयाचे!६

अमुचा नेता एक -
तयाचे सेवक आम्ही नेक
डोंगरावरी, समुद्रावरी दिग्विजया साधायाचे!७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

No comments:

Post a Comment