ॐ राम कृष्ण हरि मंत्र असावा ओठी
आवश्यक आहे गीता जगण्यासाठी!ध्रु.
श्वासाचा करते गीताई विश्वास
ती तोडुन टाके अज्ञानाचा फास
मनुजाची करते जागृत विचारशक्ती!१
कर्माने हरिशी योग साधता येतो
ओतता प्राण व्यवसायच साथी होतो
एकेक श्लोक दे अशा साधका स्फूर्ती!२
मरणाची भीती खोल खोल रुजलेली
कर्माची शक्ती म्हणून गंजुन गेली
स्थलकालांनाही लंघुन जाण्यासाठी!३
हरि कर्ता धर्ता संहर्ताही तोच
तो मी मधला मी गळे उरे मग तोच
ती सहजसमाधी साधुन (जमून) येण्यासाठी!४
मन विशाल करते श्रीमद्भगवद्गीता
जो विषाद होतो प्रसाद बघता बघता
आसक्ती सगळी सुटून जाण्यासाठी!५
तारेवर कसरत गीता गाता जमते
त्यागाची सवयच गीता लावुन देते
हे जीवन म्हणजे खेळ वाटण्यासाठी!६
गंगौघ हरीच्या मुखातून सुरू झाला
जलधारांनी त्या पार्थ चिंब भिजलेला
या सकल जनांचे अर्जुन होण्यासाठी!७
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
०९.०१.२००१
No comments:
Post a Comment