ऊठ ऊठ गे साई माउली धावत तू येई
तुझे लेकरू केव्हांचे गे वाट बघत राही!ध्रु.
तुझे लेकरू केव्हांचे गे वाट बघत राही!ध्रु.
उदी तुझी गे भान हरपवी, हटवी दुःखासी
तुजला स्मरता भाविक भक्ते हृदयच हो काशी
साईशंकर तिथे रहाया ये वेगें येई!१
लिहविसि हे तू, तूच वाचशी मीपण मावळते
बाळासंगे खेळत आई शैशव आठवते
ते निर्मळ मन ओढ अनावर दे दे मज साई!२
मज घेऊ दे साईनाथा तव मंगलनाम
नाम स्मरता असे वाटु दे हृदयच सुखधाम
साई राम तू साई कृष्ण तू , साई हरि तू ही!३
तू धेनू मी तुझे वासरू चोरू नको पान्हा
आम्ही गोपिका बावरलेल्या खट्याळ तू कान्हा
सोsहं सुस्वर तनु मुरलीतुन का काढत नाही?४
"सबूर, निष्ठा" तुज आवडती तूच तया शिकवी
परमार्थाचा पारिजात तू सदयपणे फुलवी
सुमने सुमने परिमळलेली गंध सुखे घेई!५
दे प्रेमाश्रू तेच तीर्थ मी पावन मानीन
त्या गंगेने मनातल्या मी मळास क्षाळीन
वरदहस्त तव दासा दाखव दयाशील साई!६
रचयिता: श्रीराम बाळकृष्ण आठवले
No comments:
Post a Comment