कळवळून हाका कितिदा मारू स्वामी?
मज अज्ञ बालका दर्शन द्या हो स्वामी! ध्रु.
ते श्लोक मनाचे अमोल गमतो ठेवा
करुणाष्टक कैसे वेड लावते जीवा
मन सज्जनगड हे याच रहाया स्वामी! १
अचपळ परि मन हे अंत न याचा लागे
नावरे कदा हे भलते सलते मागे
चुचकारुन त्याला अंतरि वळवा स्वामी! २
रघुनाथ कधीचा भावभुकेला आहे
हृदयीच राहुनी धरिष्ट्याला पाहे
वाढण्या आत्मबळ रहा पाठिशी स्वामी! ३
बाल्यात वाहिली चिंता या विश्वाची
का ध्यानि न घेता अगतिकता भक्ताची
मी अनन्यभावे शरण जातसे स्वामी! ४
यत्न तो देव पुरुषार्थच जीवन आहे
आलस्य दैत्य भित्रेपण मृत्यू आहे
ग्रंथातुनि अपुल्या बोला मजशी स्वामी! ५
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१५.०४.१९८०
No comments:
Post a Comment