Friday, July 15, 2022

मावळ्यांस्‍नी येडं केलं


या शिवबानं, शिवबानं मावळ्यांस्‍नी येडं क्‍येलं 
आम्‍हांस्‍नी येडं क्‍येलं! ध्रु. 

शिवबा सांबाचा अवतार 
करुणा करतो अपरंपार
भवानी आई प्रसन्‍न ह्याला गुपित आम्‍हां कळलं! १  

आम्‍हां दोस्‍तांची सेना झाली 
रामा वानरसेना मिळाली 
राज्‍य अता देवाचं, राज्‍य अता रामाचं सपन सोनेरी पडलं! २  

दिसारातीचं भान न्‍हाई 
या शिवाची लइ पुण्‍याई 
करू हेरगिरी, करू मुलुखगिरी दुजं न काही रुचलं! ३ 

याचं मधाळ रसाळ हसणं 
याचं लाघवि आर्जवी बोलणं 
या किस्‍नानं, या रामानं सहज आम्‍हाला भारलं! ४ 

लाल महालाशी संगत झाली 
आईसाहेबांची माया जडली 
या शिवबात, शिवबात शिवाचं दर्शन घडलं! ५ 

आता भितीचं नाव नाहि उरलं 
आम्‍ही काळीज कापून दिधलं 
या शिवबानं, शिवबानं प्रेमानं इकत घेतलं! ६ 

आता रामाचं राज्‍य येनार 
आता धर्माचं राज्‍य येनार 
बारा मावळातले, मावळातले मऱ्हाटी शिपाई सजलं! ७  

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले

No comments:

Post a Comment