रामनाम, रामनाम, रामनाम घेत मी!
मी तुझाच, मी तुझाच रामनाम गात मी! ध्रु.
दयामया, निरामया सर्व सर्व तूच तू
स्वार्थ तू, परार्थ तू, सर्व सर्व तूच तू
तुझेच नाम शांतवी मन्मनास नेहमी!१
तुलसी जरि म्हणवितो भांग मी असे पुरा
कोण मी, कसा असे जाणशी मला खरा
तुझेच नाम भाविका तोषवीत नेहमी!२
अनेक चोर मांडिती ठाण आत श्रीहरी
तया पिटाळ राघवा या जनास उद्धरी
तुझ्या घरी रहावया तू हवास नेहमी!३
तुझाच आसरा मला, तुझा गुलाम जाहलो
तुझाच भाव जागवीत नाम घेत राहिलो
दानशूर तू खरा दीनदास तोच मी! ४
अनाथनाथ एक तू हीनदीन एक मी
कृपाळु तू दयाळु तू हीनदीन एक मी
तुझेच प्रेम पाहिजे तुझ्या पदां नमीन मी!५
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१४.१२.१९८९
No comments:
Post a Comment