Friday, July 22, 2022

इतिहास वेड लावी

इतिहास वेड लावी, करी ध्‍येयधुंद चित्ता
तो दिव्‍य स्‍फूर्तिदाता! तो स्‍फूर्तिशाली वक्‍ता! ध्रु. 

अंधास नेत्र देतो, बधिरास कान देतो 
मूकास वाणि देतो, पंगूस वेग देतो 
नर उंच घे भरारी अवसान अंगि येता!१ 

स्‍वातंत्र्य ज्‍यास ध्‍येय, शस्‍त्रेच साह्य त्‍यास 
स्वत्वास जो भुकेला त्‍या शस्‍त्रसिद्धि ध्‍यास 
बळी तोच सर्व भोगी कथि मुक्तिमंत्रदाता!२

इतिहास मार्ग दावी इतिहास चूक दावी 
इतिहास ध्‍येय पुरवी इतिहास भीति नुरवी 
राष्‍ट्रार्थ व्‍यक्ति घडवी का सान लाभ गणता?३

इतिहास ज्‍यास घडणे इतिहास ज्‍यास शिकणे 
इतिहास ज्‍यास जगणे इतिहासरूप होणे 
त्‍या दिव्‍य व्‍यक्तिलागी इतिहास साह्यदाता!४

व्रत देत हा कठोर, सानास बनवि थोर 
राहे ना कोणि पोर दचकेच यास चोर 
चातुर्य नित्‍य पुरवी मनुजा खरा विधाता!५

प्रतिकारशक्ति देतो निजभूमिभक्ति देतो 
भयभीतिमुक्ति देतो उत्‍कर्ष युक्ति देतो 
म्‍हणुनीच वेड लावी हा जादुगार चित्ता!६

काव्‍यास ओज देतो नेत्‍यास तेज देतो 
राष्‍ट्रास ठेव होतो लोहा परीस होतो 
जाणूनि हे महत्त्व त्‍या आळवू अनंता!७ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले 
(स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांच्‍या चरित्रावर आधारित काव्‍य)

No comments:

Post a Comment