जशी संगत, तसे विचार, जसे विचार, तशी वागणूक. सत्संग लाभणे हे भाग्याचे लक्षण होय. दुर्दैवाने जीव वाईट संगतीत सापडला तर त्याचे सर्व गुण मातीमोल होतात. प्रथम इंद्रिये बहकू दिली की मग आवर घालणे कठीण होते!
विवेकाचा दीप तेवत असेल, तर अज्ञानाच्या अंध:कारात धडपडण्याची वेळ येणार नाही. सत्संगाने सत्त्वगुण पुष्ट होतो.
***********
सत्संग लाभला ज्याला, तो भाग्यवंत जाणावा!ध्रु.
जशी संगती विचार तैसे
विचार जैसे वर्तन तैसे
प्रवास आयुष्याचा सारा मंगल सुखकर व्हावा!१
एक एक गुणसुमना घ्यावे
ते भावे हरिपदी वहावे
भक्तिपंथ जो समर्थ कथिती तोच तोच निवडावा!२
कृतार्थ जीवन विकार शमता
विकार शमता मनी शांतता
सत्संगाने आचरणी ये सुखद सुखद ओलावा!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(माजघरातली ज्ञानेश्वरी या परमपूज्य ताई दामले यांच्या प्रवचनांवर आधारित काव्य)
No comments:
Post a Comment