गोपाला हे गोपाला शिकवी गीता आम्हाला १
अहंकार हा जाऊ दे अर्जुन बनता येऊ दे २
काय करावे समजेना ऐसी दीनाची दैना ३
आत्मबला तू पुरवावे कृष्णसख्या यावे यावे ४
मी माझे चे हे ओझे का आम्ही जगि मिरवावे? ५
कर्तृत्वाच्या कैफाने का आम्ही पागल व्हावे? ६
थोडेही यश मिळे जरी तोल मनाचा गेलेला ७
थोडे अपयश येत जरी तोल मनाचा गेलेला ८
सूर आमचा दाखव रे गीता गाउन घेई रे ९
तालाचेही ज्ञान हवे अधिक काय ते मागावे? १०
आप्तांशी होता झगडा मनावर बसे भयपगडा ११
ठाम भूमिका समजावी कठोर करुणा उमजावी १२
समाजात तू दर्शन दे एकांती तू चिंतन दे १३
ध्यानाचा तू दे छंद मन हे गावो गोविंद १४
जगद्गुरु हे यदुवीरा देवकिनंदन गोपाला १५
गीता येवो नित पठणी स्मरणी तैसी आचरणी १६
मण्यामागुनी फिरे मणी स्वच्छ दिसे या नयनांनी १७
प्रसन्न होशी गोविंदा सुटला बघ सगळा गुंता १८
भारतीय ते आवडावे उगमापाशी तू न्यावे १९
मना माधवा मुरडावे मुळास नेउन भिडवावे २०
गुलाम नच मी देहाचा योजक मी या देहाचा २१
विचार रुचु दे आत्म्याचा आत्म्याचा, परमात्म्याचा २२
तुझे सुदर्शन श्रीकृष्णा देत चेतना तनामना २३
अपुली कर्मे करताना स्फुरण चढावे हरिभजना २४
दे मार्मिकता, रसवत्ता सांघिकता दे धीमंता २५
समन्वयाची शिकव कला ऐक विनवणी गोविंदा २६
दुजेपणा जधि गेलेला दुःख संपले घननीळा २७
कोणी कोणा का भ्यावे आत्मरूप ते विसरावे २८
त्रिगुणांचा चाले खेळ अज्ञाने नाही कळला २९
सत्त्व सापडे हाताला तेढा सगळा सुटण्याला ३०
गीतामृत घुटका घुटका सेवन करता आनंद ३१
क्रिया पालटे तात्काळ रमारमण हे गोविंद ३२
स्वभाव बदले तव गीता थोडी थोडी ती कळता ३३
परस्परांशी समरसता अद्वयसुख लाभे हाता ३४
गीतामुरलीचे सूर आनंदा आणत पूर ३५
विरले विकारकाहूर दवडिसि दुःखाना दूर ३६
जर स्वामी बनता आले विकल्प सगळे सरलेले ३७
स्वरूप ठायी दिसलेले देहभान नच उरलेले ३८
विश्वरूप ते कल्पावे सूक्ष्मरूप ध्यानी यावे ३९
भक्तीने मन भारावे कृष्ण स्मरणे डोलावे ४०
मानवतेची ही गीता समाजसेवेची गीता ४१
नीतिन्यायाची गीता कळो आम्हा गाता गाता ४२
आत्म्याचे अविनाशित्व देहाचे बदलत जाणे ४३
ज्ञानाचे पावन करणे योगाचे मन सावरणे ४४
वासुदेव तो असे कुठे? वासुदेव तो नसे कुठे? ४५
जे कोणी अपणा भेटे योगबले हरिमय वाटे ४६
देता वाढे संपत्ती हसता वाढे आपुलकी ४७
अभ्यासे देही मुक्ती बंधुभाव मोठी शक्ती ४८
जे कळले ते सांगावे सकलांना संगे न्यावे ४९
नेटे पुढती चालावे कमलपत्रसम वागावे ५०
गीताचिंतन जो करतो तो नर नारायण बनतो ५१
गीताबावनी इथे पुरी रामा नाही हरी दुरी ५२
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२३/२४.०२.१९८३
No comments:
Post a Comment