कर्तव्याच्या मार्गावरती निर्धाराने चालू दे
श्रीरामाचा पोवाडा या श्रीरामाला गाऊ दे!ध्रु.
श्रीरामाचा पोवाडा या श्रीरामाला गाऊ दे!ध्रु.
नाम स्मरता उमजू लागे जीवनातला श्रीराम
राजा व्हावे मनामनाचा नेत्याला ना विश्राम
अतुलविहारी एकलाच तो त्याचे कौतुक गाऊ दे!१
मायपित्यांची सेवा म्हणजे सोन्याची असते संधी
प्रसन्नतेतच त्यांच्या बघतो निष्प्रभ ठरती त्या व्याधी
घरीच काशी, गंगा सरिता अनुभव घेता येऊ दे!२
दुसऱ्याचे सुख ते माझे सुख वेदना तिथे कळ येथे
समाजात या पूर्ण मिसळता बोथट होती ते काटे
देवघेव प्रेमाची ऐसी घराघरातुन चालू दे!३
सत्य सूर्य जो प्रभा तयाची तनीमनी या पसरावी
शांतिचंद्र तो आभा त्याची वदनावरती विलसावी
ठरो अयोध्या नगरी नगरी रामायण मज गाऊ दे!४
तुझे नि माझे दुजेपण असे भाल्यासम ते भोसकते
एकत्वाचे अमृत औषध संतांना ते सापडते
तू मी तो तर आत्मारामच पाठ नेहमी गिरवू दे!५
सुनील होता रामचंद्र तो, लक्ष्मीची मूर्ती सीता
सेवेचा आनंद आगळा सौमित्रहि घेतच होता
भरताच्या भावाची भरती मनोमन मला जाणू दे!६
रघुपति राघव राजाराम, पतित पावन सीताराम
जीवनमूल्ये पुन्हा जागवू भूमिके वरी ठाकू ठाम
चुका आमुच्या आम्ही सुधारू आशा ऐसी पालवु दे!७
रामायण वाचता ऐकता मनात येतो ओलावा
जिव्हाळा वाढतो होतसे भाऊ आवडता भावा
भोगाहुनही त्याग सुखाचा जे जे कळते ते वळु दे!८
संस्काराविण मानव दानव संस्कारे घडतो देव
हासत करतो सहन वेदना तो मानव ठरतो देव
देहाच्याही पलीकडे तो आत्मा रामच जाणू दे!९
पतिपत्नींचे मंगल नाते भावाभावांची माया
कर्तव्याच्या पालनात श्रीराम मंदिराचा पाया
नामाचा ध्वज कळसावरि तो आनंदाने फडकू दे!१०
चिंतनास चालना चैत्र दे रहस्य नकळत उलगडते
तप केल्याविण आम्रफलाला अमृतपण कोठे मिळते
सागरावरी सेतु बांधला स्फुरण त्यातुनी लाभू दे!११
अशिवातुन शिव ये जन्माला राजा दशरथ करि दिव्य
पाप्याला देहांतच शासन उजळे तेणे भवितव्य
भ्रष्टाचारच रावण त्याला सज्जन राघव दंडू दे!१२
महाकाव्य इतिहास अलंकृत आदरपूर्वक अभ्यासा
आचारे आचार्य होतसे सद्गुण दैवी जोपासा
अभिनव पाठ्यक्रम हा ऐसा पालट सुंदर घडवू दे!१३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१०.०३.१९९९
No comments:
Post a Comment