निरहंकाराने देव आपलासा होतो!
परमार्थ मार्गाची थोडीशी वाटचाल झाली, की वाटतं, आपण विशेष आहोत. (हाच अहंकाराचा वारा..). प्रत्येक जण आपण केलेल्या परमार्थाचा हिशोब मनात जुळवत असतो.
आपली साधना पूर्ण झाली आहे असे ज्याला वाटते, तो संपलाच समजावा! नाम घेता घेता जो स्वरूपाशी तदाकार झालेला असतो त्याच्याकडेच भगवान जातात व त्याचा हात धरून त्याला घेऊन जातात.
अहंकाराजवळ परमेश्वर कसा येईल?
********
भगवंता इतके द्यावे -
' मी माझे ' सर्व सरावे!ध्रु.
मी कर्ता घातक भाव
मग सरे न धावाधाव
लेकरा कडेवर घ्यावे!१
अभिमान वसन हे मळके
कधी भरते गळके मडके?
मन निरहंकारी व्हावे!२
तू साधन घे करवून
मज पटो आपली खूण
संसारी असुनि नसावे!३
रचयिता: श्रीराम बाळकृष्ण आठवले
०९.११.१९९३
माजघरातली ज्ञानेश्वरी या परमपूज्य ताई दामले यांच्या प्रवचनांवर आधारित काव्य.
No comments:
Post a Comment