Sunday, October 1, 2023

गीतादीपक करी धरी । भक्तिपथावर कार्य करी।

गीतापोथी धर हाती । भाव हवा कृष्णावरती । 
हिंडत जा पृथ्वीवरती। ही भक्ती।।१।।

कर्म करावे आलेले। नाम हवे ओठी आले ।
कृष्ण चालवी मी चाले। सुबोध हा।।२।।

गीता मातांची माता। ती कळते गाता गाता। 
भेद नुरे नावापुरता। ऐक्यच हे।।३।।

जीव शिवाचा एकपणा। कसा कळावा शब्दांना। 
जोडत जा तू मने मना। ही माळ।।४।।

जे येते ते सांग जना । मनात ठेवुन नम्रपणा ।
नयनी गंगेची करुणा। ही गीता ।।५।।

चुकता चुकता शिकायचे । पडता हासत उठायचे ।
पुढती पुढती जायाचे। गा गीता ।।६।।

तूच तुझा उद्धार करी । आत्मारामा गुरु करी ।
त्यजुन फलाशा कर्म करी। जीवन हे।।७।।

विचार गीतेचा घ्यावा । आचरणी तो आणावा ।
श्रीव्यासांचा मागोवा। नित घ्यावा।।८।।

गीतादीपक करी धरी । भक्तिपथावर कार्य करी।
प्रकाश अंतरि बाहेरी । कृष्णकृपा।।९।।

रचयिता :  श्रीराम बाळकृष्ण आठवले
२०.१०.१९८४

No comments:

Post a Comment