पार्था रणांगणि जिथे अति मोह झाला
कर्तव्य काय म्हणुनी रणि स्तब्ध झाला
सोडूनि स्वार्थ, रणि झुंजच धर्म आता
आहे खुली सकलिकां मननास गीता!१
नैराश्य येथ मुळि ना अति धैर्य आहे
चांचल्य येथ मुळि ना अति स्थैर्य आहे
सामर्थ्य मूर्त प्रकटे किति लाभ मोठा
आहे खुली सकलिकां मननास गीता!२
एकेक श्लोक मतिला अति चालना ती
एकेक मौक्तिक असे सहवे न दीप्ती
रत्नाकरास जगती नच जोड आता
आहे खुली सकलिकां मननास गीता!३
पार्था निमित्त करुनी उपदेश केला
जो ऐकता सपदि मोह निघून गेला
आसक्ति सोड सगळी सुटतोच गुंता
आहे खुली सकलिकां मननास गीता!४
मी देह देह म्हणता बनते समस्या
कर्तृत्व भार वहता फसते तपस्या
यज्ञार्थ कर्म सगळे, नच मोह भक्ता
आहे खुली सकलिकां मननास गीता!५
बिंदू न भिन्न उरतो सरितेविना तो
दानाविणा न कवणा कधि लाभ होतो
द्या ज्ञान जे जवळचे जपयज्ञ मोठा
आहे खुली सकलिकां मननास गीता!६
जे दिव्य भव्य सगळे हळु मेळवावे
माझ्यापरीच सगळे मनि वागवावे
कृष्णांकिता न जगती कसलीच चिंता
आहे खुली सकलिकां मननास गीता!७
वृत्तीत पालट घडे जर ध्यास लागे
ही इंद्रिये वश मना जर ध्यास लागे
नाही अशक्य जगती अभ्यास घडता
आहे खुली सकलिकां मननास गीता!८
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
No comments:
Post a Comment