Tuesday, October 31, 2023

तो नर कृतार्थ मानी, अर्जुना!

भगवान श्रीकृष्‍णांना अर्जुनासारखा जिज्ञासू श्रोता लाभला.  निष्‍काम कर्माचा बोध कोणाला झाला असे समजावे? ज्ञानी पुरुष संसारात कसा वावरतो? अशा प्रश्‍नांची उत्‍तरे देण्‍यासाठी भगवान श्रीकृष्‍ण त्‍या पुरुषाची लक्षणे सांगू लागले.  ज्ञानरूप अग्निज्‍वालेने फलाशा  बुद्धीचे अंकुर मुळातच नाहीसे झालेले आहेत असा कृतकृत्‍य पुरुष मनुष्‍यररूपाने ब्रह्मच मानावा असा गौरव श्रीकृष्‍णांनी केला.  अर्जुनास तसे होण्‍याची प्रेरणा दिली 
*******

तो नर कृतार्थ मानी, अर्जुना! ध्रु. 

पदतळि तुडवित अहंभाव तो 
आकाशासम विशाल होतो 
चित्ती ज्‍याच्‍या भाव आपपर नाममात्र राहीना! १ 

देहासक्ती ज्‍याची मिटली 
चित्ताची तर भ्रांती फिटली 
करुनी कर्मे कर्मरहित तो कर्तेपण स्‍वीकारिना! २ 

योगक्षेमा खेळ खेळतो 
साक्षित्‍वाने स्‍वये पाहतो 
हेतुशून्‍य निष्‍काम कर्म ते यज्ञ थोर ही भावना! ३ 

ज्ञानाधारे द्वैत नाशते 
अनुभवधन परि विशुद्ध उरते 
सोऽहं सोऽहं ही अनुभूती उज्ज्वल करिते जीवना! ४ 

त्‍याग नाव यज्ञाला दुसरे 
तनमनसंयम योग जाण रे
ज्ञानयज्ञ तर तोडी तटतट सर्व तऱ्हांच्या बंधना! ५ 

संकल्‍पाचे अतीत व्‍हावे 
मोही कसल्‍या नच गुंतावे 
ज्ञानाग्‍नी करि भस्‍मसात झणि कर्मरूपी इंधना! ६ 

पवित्रतम जगि ज्ञानच केवळ 
मुक्त दरवळो विरक्ति परिमल 
परमशांति ज्‍या मिळवायाते विलंब काही लागत ना! ७  

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले 
०१.०१.१९७३

No comments:

Post a Comment