Wednesday, October 4, 2023

वाच ज्ञानेश्वरी

दुपारी दुपारी वाच ज्ञानेश्वरी 
अर्थ थोडा तरी उकलेल १

ताप प्रपंचाचा जाच तो मनाचा 
तोच कायमचा संपणार २

एक एक ओवी आदरे वाचावी
चिंतनाला घ्यावी गृहिणींनी ३

जे का माझे दुःख जे का माझे सुख
त्याचे का कौतुक करायचे? ४

मायतात गेली सरली सावली
पोरकी ज्ञानुली आई झाली ५

बाया बापड्यांची सखी आवडीची
तीच आळंदीची ज्ञानाबाई ६

सोपी केली गीता शांतविले चित्ता
सोपविली सत्ता अध्यात्माची ७

ग्रंथ ज्ञानेश्वरी सासरी माहेरी 
बाहेरी अंतरी अभ्यासावा ८

ओवी वाचू जाता भक्तीने ऐकता 
मन हे निवता धन्य वाटे ९

विष हो अमृत दुष्ट सत्प्रवृत्त 
नीच हो उन्नत श्रवणाने १०

सयांनो घ्या वसा एके जागी बसा
उमटेल ठसा माऊलीचा ११

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(माजघरातली ज्ञानेश्वरी या परमपूज्य ताई दामले यांच्या प्रवचनांवर आधारित काव्य)

No comments:

Post a Comment