जय जय विठ्ठल रखुमाई ! ध्रु.
कटीवरी कर ठेवुनि असती
जे येती त्या धीर पुरवती
कलियुगात नवलाई!१
पतिपत्नींची ऐसी जोडी
प्रपंचात परमार्था जोडी
इथे शिकू चतुराई!२
उभ्या जगाची यांना चिंता
परि मुद्रेवर ना त्रासिकता
ठाम भूमिका राही!३
चरण जुळवुनी उभे रहावे
तटस्थ व्हावे, अवलोकावे
संकट येई जाई!४
संतांचे माहेर पंढरी
ते तर आले अपुल्या दारी
सदनच पंढरि होई!५
दुःख दुज्याचे जाणुनि घ्यावे
अश्रु पुसावे उरी धरावे
मन गंगाजल होई!६
नाम घालते मनास आळा
नाम नमविते त्या कळिकाळा
हरिपाठा नित गाई!७
पुंडलिकास्तव विठ्ठल आला
रखुमाईला निरोप कळला
पति शेजारी येई!८
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२८.०२.१९९५
No comments:
Post a Comment