अचपळ मन माझे नावरे आवरीता
तुजविण मज कोणी नाहि रे सावरीता
पळभर तरि चित्ता शांतता सापडावी
निशिदिनि मधुगीता अंतरंगी जपावी!१
मजसम जगि कोणी नाही तत्वार्थवेत्ता
अजुनिहि भुलवीती मानसा श्री नि सत्ता
प्रतिपळ बुडताहे काय युक्ती करावी
निशिदिनि मधुगीता अंतरंगी जपावी!२
मजवरि करुणेचा माधवा पूर लोटी
अगणित अपराधा माधवा घाल पोटी
घडिघडि मम वृत्ती सद्गुरो पालटावी
निशिदिनि मधुगीता अंतरंगी जपावी!३
स्मरणरहित कृष्णा सर्व हा जन्म जाई
झडकरि मम साह्या केशवा कोण येई
तळमळ निववाया माउली आठवावी
निशिदिनि मधुगीता अंतरंगी जपावी!४
सहजच तनु टाकी घाबरा जीव होतो
तडफड बहु चाले पूर्ण अस्वस्थ होतो
अजर अमर आत्मा खूण त्वां दाखवावी
निशिदिनि मधुगीता अंतरंगी जपावी!५
हळुहळु मन होई संयमी नी विचारी
अगणित बुध योगी सांगती तू सुधारी
धडपड मम देवा मी कशी चालवावी
निशिदिनि मधुगीता अंतरंगी जपावी!६
वश न मन जयाला सर्वथा तो भिकारी
स्थिर मति जगि ज्याची तो खरा ब्रह्मचारी
अनुसरु तरि कोणा तू दिशा दाखवावी
निशिदिनि मधुगीता अंतरंगी जपावी!७
चुकत शिकत जाता थोर आनंद व्हावा
"हरि, हरि" म्हणताना मुक्तिमेवा मिळावा
नरतनु प्रभुकार्यी चंदनी खोड व्हावी
निशिदिनि मधुगीता अंतरंगी जपावी!८
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
No comments:
Post a Comment