Monday, October 16, 2023

खोटी आशा घात करते



खरे तर परमेश्वर सर्वत्र भरलेला आहे. पाने, फळे, फुले त्याचीच रूपे हे माहीत नसल्याने समोर प्रभू असून दिसत नाही. चैतन्यमय प्रभू आपल्या अंतःकरणातच आहे. परमेश्वराशिवाय इतकं जवळ शेवटपर्यंत कोणी असत नाही. हे न कळल्याने मानव दुःखी होतो. सुख मिळेल या खोट्या आशेने ऊर फुटेतो धावतो आणि मरून जातो.  दुःखाचे मूळ षड्रिपूत आहे. एका ठिकाणी बसून चिंतन करणे जमले पाहिजे सद्गुरूंचा लाभ झाल्यावर त्यांच्या उपदेशानुसार अभ्यास केला तरच मानवी जीवन कृतार्थ होते.

************

सुख मिळेल आशा सोडावी
विषयांची संगत टाळावी!ध्रु.

हाव हावरी फरफट करते
क्रोधे अंतःकरण पेटते
षड्रिपुच फसविती मायावी!१

चल एक ठिकाणी बैस जरा
बघ रम्य पसरली वसुंधरा
सोऽहंची मुरली ऐकावी!२

हरिचिंतन चिंता घालवते
आतल्या हरीला भेटविते
सद्गुरुकृपा ही समजावी!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
०६.११.१९९३
(मजघरातली ज्ञानेश्वरी या परमपूज्य ताई दामले यांच्या प्रवचनांवर आधारित काव्य)

No comments:

Post a Comment