देह हेच गोकुळ आहे
तुझा तूच शोधुन पाहे!ध्रु.
तुझी इंद्रिये या गाई
चपळतेस सीमा नाही
कोण वाजवूनी पावा मना वेधणारा आहे?१
कृष्ण कृष्ण गात रहावे
शांत शांत बनता यावे
श्वास श्वास नामा बांधे असा कोण आहे?२
प्रेम घेत वितरत प्रेम
रहायचे पाळत नेम
प्रेमरूप होता येते भाव ठाम धरुनी राहे!३
वृत्ति विविध त्या त्या गोपी
आवरण्या युक्ती सोपी
राम कृष्ण हरी गोविंदी लीन होउनीया राहे!४
कृष्णजन्म देही व्हावा
बद्ध जीव मुक्तच व्हावा
खरा इंद्रियांचा स्वामी नंदकुमर आहे आहे!५
दिव्य ध्येय पुढती राहो
दिव्य कार्य घडतच राहो
रास खेळणे कृष्णाशी निदिध्यास लागुनि राहे!६
राम कृष्ण हरि गोविंद
मना हाच लागो छंद
सूर सूर वेणूचा तो श्रवणि येत आहे!७
कृष्ण गीत गाता यावे
स्वच्छ स्वच्छ गोकुळ व्हावे
श्यामकरी मुरली तूच दुजे कोण आहे?८
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
No comments:
Post a Comment