Sunday, September 18, 2022

गोविंदकाका उपळेकर हो ऽऽ ओढ कशी लागली

गोविंदकाका उपळेकर हो ऽऽ
ओढ कशी लागली 
ब्रह्मच केवळ फलटणचे हे 
हसे ज्ञानमाउली!ध्रु. 

आहे- असु दे, नाही नसु दे 
भेद त्यात काय? 
हरिपाठाची पुरे शिदोरी 
पुरवुन ती खाय 
सदा हसावे, डुलत चलावे 
चिंतनात मुरली!१ 

हरि हरि म्हणता आनंद वाटे 
काटे बोथटती
कडु घोट परि सुखद गिळाया 
किमया गुरु करती 
उन्मनीत काका नित भेटा 
भूक तीव्र लागली!२ 

नयन मिटावे, आत पहावे 
हरिबाबा आत 
हात धरूनि ते खेचुन घेती 
गात्रे निवतात 
संगति लागे विसंगतीतुन 
कृष्णकृपा झाली!३ 

सुबोधिनीचे लेखन अपुले 
एक चमत्कार 
आघातांनी सुखद वेदना 
मन ब्रह्माकार 
मीपण लोपे, पाप विलोपे 
हरिमय योगबळे!४ 

अता न मागे फिरावयाचे भक्तिपथावरती 
कृष्णदेव गोविंदा मिळता 
फिटे भवभ्रांती 
माया तोडी पुसे सावली 
काका हे कळले!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२४.०९.१९९७
भाद्रपद कृ ८

No comments:

Post a Comment