गोपालकृष्ण! राधाकृष्ण!
गोपालकृष्ण! राधाकृष्ण! ध्रु.
गोपालकृष्ण! राधाकृष्ण! ध्रु.
छंद जिवाला तुझा लागला
गोकुळास मज ने घननीळा
ऐकव मुरली - अधीर पैंजण!१
मोरपिसांचा मुकुटहि सुंदर
कसा झळाळे बघ पीतांबर
स्मित वदनावर असे सुदर्शन!२
निसर्ग नटला वायुलहर ये
दृश्य जपावे जे न पुन्हा ये
चित्त चोरतो हा मनमोहन!३
अम्ही गौळणी सगळ्या जमुनी
बघत राहतो मूर्ति देखणी
दृष्ट न लागो, होतो उन्मन!४
वाजव वेणु ऐके धेनु
नीलाकाशी थबके भानु
ऊन कोवळे, शीतल चंदन!५
नरनारी हा भेद लोपला
मांगल्याचा अंकुर डुलला
मुरली सांगे लंघा कुंपण!६
घरी बसावे नयन मिटावे
आत वळावे मने पहावे
ध्येय ध्याता ध्यानहि मोहन!७
मनात राधा तिजला बाधा
तव ध्यानाचा उपाय साधा
अवघ्या आशा श्रीकृष्णार्पण!८
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
३०.०७.१९९४
No comments:
Post a Comment