Sunday, September 25, 2022

भावार्थासह गीता समजो स्वामी स्वरूपनाथा


भावार्थासह गीता समजो स्वामी स्वरूपनाथा
अपुल्या चरणी टेकवीत मी हात जोडुनी माथा!१
साकी मजला बहु आवडली अंतरात ती ठसली
श्रीकृष्णाची कानी आली आतुन गीतामुरली!२
कळेल गीता गाता गाता ऐसा हा विश्वास
जे जे कळते ते ते वळते गुरुकृपेने खास !३
अर्जुन झालो जर मी स्वामी माधव आपण माझे
गुरुशिष्यांच्या संवादा या नित्य नवेपण ताजे!४
प्रातःकाळी नित्य म्हणावी भावार्थासह गीता 
उदात्त उन्नत होवो मानस गाताना श्रीगीता!५
अभ्यासाची मना माझिया ओढ अशी लागावी
अक्षर अक्षर पुरे ठसू दे आस हीच पुरवावी!६
मनात येता पावसला मी ऐसा अनुभव यावा
कृपाहस्त पाठीवर माझ्या स्वामी नित्य फिरावा!७
परिस्थितीशी जुळवुन घेणे मजला सहज जमावे
सदा हासरे जगास स्वामी माझे वदन दिसावे!८
लेखन अपुले मना लाविते अभ्यासाचा छंद 
डोळे मिटता मला जाणवे झालो मी गोविंद!९
प्रभातकाली मला उठविता धरुनि माझा हात
लिहू लाग तू बाळा वदता स्वामी स्वरूपनाथ!१०
रुक्ष वाटतो, वर्तनात मम ओलावाही यावा
विषयांचा तो लाग सुटावा कृष्णयोग साधावा!११
रामकृष्णहरि वदो वैखरी संजीवन दे मंत्र
गीता आचारात यायचे मला जमू दे तंत्र!१२
देहामधले विकार कौरव गाजवती अधिकार
विचार पांडव स्वराज्य इच्छिति कृष्णाचा आधार!१३
मी नच कर्ता, न लगे फल मज अंतरात बाणावे
स्वकर्मसुमने हरिपदी वाहुन कृतार्थ होता यावे!१४
अवघड नाही जगात काही, भेसुर नाही काही
इथेतिथे श्रीहरि कोंदला रिता ठाव मुळी नाही!१५
चलता चलता वाट संपते विश्रांतिस्थल येई
हळूहळू ये कर्मि कुशलता सुस्थिर मानस होई!१६
प्रयाणकालाची का चिंता अवघे हरिमय होते
सरे अहंता विश्वात्मकता तदा साधका वरते!१७ 
भलेबुरे वा जे जे घडते तुझिया आयुष्यात 
हरिची इच्छा असे मान तू बुडू नको मोहात!१८
जसा वागशी इतरांशी तू तसे वागती इतर
प्रेम लाभते प्रेमळ मनुजा पडो न याचा विसर!१९
एकांतामधि बसुनि घ्यावी आपआपली भेट
वाट अशी ही मुक्कामाला पथिका  नेई थेट!२०
चुकले नाही कर्म कुणाला का कंटाळा त्याचा 
ज्ञानासाठी आश्रय लागे घ्यावा कर्तव्याचा!२१
श्रीकृष्णाचे जीवन कैसे सांगे भगवद्गीता
मार्गदीप हा उपकारक हो जीवनयात्री करिता!२२
देव व्हायचे दानव किंवा ठरव तुझे तू आधी
दैवी संपद् थांग तिचा ना कुणास लागे आधी!२३
चुकता चुकता शिकता येते शिकेन मी हे बोल 
हृदयनिवासी सद्गुरु आतुन सावरती तव तोल!२४
आशावादी सदा असावे यत्न देव तो मान 
कर्म घडे जे कृष्णाज्ञेने यज्ञरूप ते जाण!२५
जे जे घडते ते कृष्णार्पण म्हणता देही मुक्ती
नाम स्मरता अंतःकरणी भक्तीला ये भरती!२६
जे जे भाविक  तया जनांना गीता सांगत जावे
आनंदाच्या प्रकाशात या आनंदाने गावे!२७
मनोबोध तो गीता आहे हरिपाठातही गीता 
तुकयाच्या त्या अभंगातही ऐकू येई गीता!२८
शिवथरघळ तर तुझ्या मानसी तूच शिष्य कल्याण
रामदास ते गीतागायक श्रोता तूच सुजाण!२९
जो सावध तो त्यावर ना ये पस्ताव्याची पाळी 
करू नये त्या कर्मालाही सहजपणाने टाळी!३०
तूच तुझा उद्धार करी हा श्रीगीतेचा घोष 
खचू न देई मना कधीही सदा मान संतोष!३१
देहामध्ये देव पहावा राखावा तो तुष्ट 
साह्य कराया धावत जावे दुजाभाव हो नष्ट!३२
एकटेपणा वृद्धा छळतो थोडी सोबत द्यावी
मधुर भाषणे, मधुर गायने आशा ती पुरवावी!३३
कसे वागशी तू इतरांशी गीतादर्शन त्यात
भलेपणाने जगी वागता सोऽहं आचारात!३४
देह येतसे देह जातसे खूणगाठ बांधावी
आत्मतत्त्व ते ध्यानी घेउन दुःखे ही सोसावी!३५
सुधारण्याला प्रत्येकाला जगात लाभे संधी
यज्ञचक्र जो चालू ठेवी समाज त्याला वंदी!३६
श्रवण करावे मनन करावे नाम स्मरता स्मरता 
जीवनात ये सहजच गीता गीता सर्वांकरिता!३७
ओंकाराच्या उच्चाराने  शांत शांत मन होते
मन पवनाला जाउन मिळते भजनानंदी रमते!३८
नित्य वाचनी गीता ज्याच्या ओठावरती नाम
सोऽहं मुरली त्याच्या कानी जी वाजवितो श्याम!३९
मुरवावा जर बोध अंतरी गीतामृत सेवावे
या गीतेच्या सरितेतीरी सांजसकाळी यावे!४०
आनंदाचे स्वरूप म्हणजे स्वरूप हा आनंद
ज्ञानी कर्मी योगी आहे भरला परमानंद!४१
देहाच्याही पलीकडे जो पहावायला शिकला 
त्या भक्ताला त्या ज्ञान्याला निराकार आकळला!४२
तत्त्वापासून ढळू नको रे गीतेचा संदेश
या देही या जन्मी मुक्ती देत तुला परमेश!४३
क्षण जो गेला वाया गेला तो न पुन्हा ये हाती
हे जाणुनिया ज्ञानी सज्जन अनुसंधानी असती!४४
इथली नाती मायावी ती खरा सोयरा राम
हे जाणुनिया अलिप्त राहुन शोधी आत्माराम!४५
परिस्थिती ही प्रश्नपत्रिका भगवंताने दिधली
सावधतेने चातुर्याने पाहिजेच सोडविली!४६
खचू न द्यावे धैर्य कधीही उत्साहाने जगणे
ओघे आले कर्म करावे नको नको डगमगणे!४७
केव्हाही तू श्रीगीतेचा श्लोक चिंतना घेई
पुनर्जन्म मानवा तेधवा नि:संशय तव होई!४८
तुझ्या रथाचे सूत्र मानवा कृष्णाहाती दे रे
करुनि अकर्ता कसे व्हायचे झणी शिकूनी घे रे!४९
जे कळते ते जना सांगता स्वभाव बदलत जातो
शोकाकुल तो आत्मज्ञाने वीरधीर तो होतो!५०
हो मृत्युंजय हो शत्रुंजय धनंजया तू आता
असे जाणवो जनांस कळते गीता गाता गाता!५१
सदा हासरा सदा खेळकर त्याला गीता कळली
अंतर्मुख तो लुटे आत्मसुख ऐके सोऽहं मुरली!५२
जो मज भजतो जैशा भावे तयास तैसा प्राप्त
हे आश्वासन माझे आहे भक्ताचा मी आप्त!५३
कृपा आपली स्वामी मजवर मला आपुले म्हटले
अश्रुजलाने श्रीरामाने चरण आपुले धुतले!५४
स्वरूप बोधावरी राहशिल द्यावा आशीर्वाद 
आणिक दुसरे न लगे मजला हा सद्गुरुप्रसाद!५५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

No comments:

Post a Comment