माझा गणेश सुखवी मजला
करवुनि घे अभ्यास चांगला!१
माझा गणेश थांबवि पुढती
फिरते अंगांगावर दृष्टी!२
माझा गणेश दे संजीवन
वय वाढे परि अक्षय यौवन!३
माझा गणेश श्री गुरुनाथ
परिस्थितीवर करवी मात!४
माझा गणेश गुणगंभीर
वेळोवेळी पुरवी धीर!५
माझा गणेश आसनि बसवी
मुळाक्षरे योगाची शिकवी!६
माझा गणेश असा पकडतो
भवसागरी पोहणे मुरवितो!७
माझा गणेश दिसो ना दिसो
सोऽहं ध्यानी सुंदर विलसो!८
माझा गणेश निजशुंडेने
अजरामर करी आत्मज्ञाने!९
माझा गणेश श्रवणकीर्तने
करी अपणासम अनुग्रहाने!१०
माझा गणेश सोऽहं आहे
स्वयंसिद्ध जगि जो तो आहे!११
नकोस विसरू स्वस्वरूपाला
माझा गणेश निक्षुन वदला!१२
माझा गणेश रक्षणकर्ता
हितशत्रूंवर रोखे भाला!१३
सोऽहं सोऽहं भजनामध्ये
माझा गणेश वसला आहे!१४
तिमिराकडुनि प्रकाशाकडे
माझा गणेश नेतो आहे!१५
असूनही देही पूर्ण विदेही
माझा गणेश ऐसा राही!१६
माझा गणेश मना मुरडवी
सैरावैरा धाव संपवी!१७
माझा गणेश जेथे आहे
समाधान तेथे दिसताहे!१८
माझा गणेश घडवी लीला
शक्तियुक्तिसत्कृतिंचा मेळा!१९
स्थिरचर व्यापुन दशांगळेही
माझा गणेश उरला पाही!२०
वदनावर अंगुली ठेवुनी
गणेश सांगे व्हावे मौनी!२१
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२४.०८.२००४
No comments:
Post a Comment