लोकमान्य टिळकांना साऱ्या समाजात जागृती घडवून आणायची होती. लोकशिक्षण द्यावयाचे होते. त्यांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक रूप दिले. त्या काळात सर्वत्र व्याख्याने, प्रवचने, कीर्तने, पोवाडे, मेळे असल्या सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असे. गणपति विसर्जन मरवणुकीचा सोहळा तर अवर्णनीय असे. एकच एक गजर घुमत राही -
गणपति बाप्पा मोरया!
सुतार, माळी, कुंभारांनो, व्यापाऱ्यांनो या हो या
एकमुखाने हिंदू सारे, मुक्त स्वराने गर्जू या
गणपति बाप्पा मोरया!ध्रु.
आम्ही कोण ही होत विस्मृती
विघ्नहरी आणील जागृती
श्रद्धाभावे करू आरती
हिंदु अस्मिता जागवु या, गणपति बाप्पा मोरया!१
गणाधीश तर हे जनदैवत
जनसत्तेच्या मंत्रा वितरत
शक्ति बुद्धि ते स्वये उपासत
आत्मगौरवा अनुभवु या- गणपति बाप्पा मोरया!२
दहा दिवस कैसे हे गेले
भजनि रंगता नाही कळले
स्फूर्तिगान ते गाती मेळे
तालावरती नाचू या, गाऊ या गणपति बाप्पा मोरया!३
गुलाल भाळी विराजतो
सनई चौघडा दुमदुमतो
लेझिम ताफा झणझणतो
गर्जन गगना भिडवू या - गणपति बाप्पा मोरया!४
जागृत होवो नवजनशक्ती
विकसित होवो पूर्ण समष्टी
ज्ञानभक्तिची मिळू दे संगति
गणराज्या मनि उभारुया! गणपति बाप्पा मोरया!५
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
३१.०१.१९६८
No comments:
Post a Comment