गणेशाचे तत्वज्ञान सांगतसे गजानन
रामे घेतले लिहून वाचतसे आवर्जून १
रामे घेतले लिहून वाचतसे आवर्जून १
मूर्ति मृण्मयी पाहिली धार डोळ्यांना लागली
सर्व किल्मिषे धुतली कृपा गणेशाची झाली २
बाळा यावे आनंदात परतावे आनंदात
भक्तिगीत गात गात सुखदुःखांवर मात ३
नाही कायम राह्यचे केव्हातरी निघायचे
व्यर्थ नाही गुंतायचे असुनीया नसायचे ४
अर्थ जाणाया वाचावे अर्थ जाणून वाचावे
अर्थ जाणून म्हणावे मनामध्ये घोळवावे ५
एक सत् तत्त्व गणेश सर्वां होतसे प्रत्यक्ष
भक्तिभावनाच साक्ष ध्यावा मनाने अलक्ष ६
कर्ता धर्ता गणपती स्वामी एक गणपती
शुभाशुभ गणपती मानता न उरे खंती ७
चल माग गणेशाला जाई शरण तयाला
करी पूर्ण अपूर्णाला लाग मोदाने कामाला ८
स्वर लताचा गणेश नृत्य गोपीचे गणेश
ज्ञान विज्ञान गणेश ब्रह्मचैतन्य गणेश ९
जर श्रद्धा जोपासली फळे वृक्षा लहडली
लिही ओळी पाठी ओळी नित्य दसरा-दिवाळी १०
आत्मबला जागवावे कधी देवा न निंदावे
भोग हासत सोसावे दुःख गणेशा कथावे ११
होवो मेळा साधकांचा गण ऐसा घडायाचा
विरंगुळा हा जिवाचा जोर वाढे साधनाचा १२
ध्येय उदात्त असावे त्याच्या प्रकाशी चालावे
मन क्षुद्र न करावे सर्वात्मका तोषवावे १३
गेले त्याची नको खंत असो उत्साह अनंत
पाठीराखा भगवंत भरवसा हा वसंत १४
गुण एकेक जोडावा मनी गणेश पूजावा
सरो सगळा दुरावा जोडीदार सुखी व्हावा १५
चतुर्थी ते चतुर्दशी पहा दहाच दिवस
सत्कार्याला लागो देह असा पुरव नवस १६
हेच मागावे गणेशा माझे मागणे सरावे
तुझ्या अथर्वशीर्षाचे मला कवच लाभावे १७
सूर लागू दे गाताना मन रमू दे ध्याताना
गती वाढो चालताना आत्मविश्वास या म्हणा १८
कायाकल्प श्रीगणेशा घडो यावा जगदीशा
तोष व्हावा स्वरूपेशा अगा दयाळा सर्वेशा १९
तोष व्हावा स्वरूपेशा अगा दयाळा सर्वेशा १९
सदा सर्वदा स्मरण नाम मुखी गजानन
हेच भरण-पोषण स्वत्मस्वरूप चिंतन २०
अगा दयेच्या निधाना गणपते गजानना
घेगा सामावून रामा गणनाथा त्रिलोचना २१
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
No comments:
Post a Comment