प्रभात होण्याआधी मजला नवनाथांनी जागवले
वीररसाची जोड भक्तिला दे दे आधी सांगितले!ध्रु.
वीररसाची जोड भक्तिला दे दे आधी सांगितले!ध्रु.
डरायचे या जगात नाही, गजाननाला नमन करी
सूत्रे ध्यानी ठेव साजरी, ॐ तत् सत् दे ललकारी
शिव शिव म्हणता आदिनाथ गुरु डमरूनाद करत आले!१
श्री गुरुदेवा दत्तात्रेया अनसूयासुत हसलात
काळोख्या रात्रीतुन झाली ज्योत्स्नेची जणु बरसात
उमेद वाढव नित जनतेची लेखणीने झरझर लिहिले!२
गूढ असे या जगात नसते उणीव डोळस पठणाची
चिकाटीस धर, धावे स्फूर्ती खूणगाठ वक्तृत्वाची
झपझप चालावे, न अडावे, माय धरित्री हे वदले!३
हाव हावरी करते फरफट, काळा पैसा यमपाश
भल्या गृहस्था परिवारासह गाडे विघ्नांची रास
मोहाचा कर होम माणसा कृष्णमेघ जणु गडगडले!४
भले बुरे ते प्रत्येकाला आतुन कळते विवेक तो
विचार त्याचा भाऊ, भक्ति ही बहीण संबंधच असतो
बलोपासना सतेज करते, आदित्यही हासत बोले!५
निष्ठा सांगे निसटायाचे कसलाही हव्यास नसो
सदाशिवाला, उमापतीला निर्मळ सुंदर स्थान असो
पोथीमधल्या घटनांची ही संगत हलके सांगितले!६
श्रीनवनाथ जय नवनाथ शब्द खुणेचे यावेळी
येता जाता घरच्या देवा वंदन कर जाणीव दिली
आत्म्यावर विश्वास बालका ठेव पडो हे स्मरण दिले!७
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
No comments:
Post a Comment