Monday, September 26, 2022

प्रभातकाली सोऽहं भावे भूपाळी आळवू! स्वरूपनाथा सद्गुरुनाथा हृन्मंदिरि बसवू!

प्रभातकाली सोऽहं भावे भूपाळी आळवू!
स्वरूपनाथा सद्गुरुनाथा हृन्मंदिरि बसवू!! ध्रु.

शांत सुशीतल वातावरणी तनु पुलकित झाली
स्वामी अपुली मूर्ति आगळी हसतमुखे आली
कर जोडुनिया मस्तक अमुचे पदकमली ठेवू!१

भारतीय मी, देश देव हा भाव पुरा जागला
जातिधर्मभाषांचा भेदहि लोपुनिया गेला
नाथपंथिची ध्वजा स्वामिजी नभि डोलत ठेवू !२

अभंगातुनी ओवी प्रकटे सोपी ज्ञानेश्वरी
साधकासही ध्याना बसवी माता योगेश्वरी
अमृतधारा वाचुनि नाचत मरणभया पळवू !३

पावस हे घर, घरात पावस स्मरणी आवेग 
घन जलधारा बरसत आला श्रावणीय मेघ
नित्यपाठ नेमाने म्हणता पद पुढती ठेवू !४ 

अलकापुरिच्या ज्ञानेशा हे पावसच्या नाथा
अलौकिका घ्या प्रणाम कोटी झुकलासे माथा
एक हृदय हो भारतजननी भाव मधुर जागवू !५ 

स्वामी माझे, मी स्वामींचा संजीवनि गाथा 
आळविताना अभंग त्यातिल कंपित तनु आता
चिरंजीविता कृतीत वचनी  सकलांना दावू !६

स्तवन करावे शब्द न पुरती मन हे मौनावे
दर्शनास हे नयन न पुरती ते मिटुनी घ्यावे
श्रीरामासह बंधु नि भगिनी भावफुले वाहू !७ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

No comments:

Post a Comment