श्रीरामाचे जीवन गा! शिकत रहा तू! शिकत रहा! ध्रु.
तुझ्याजवळ जे असेल ते दे
विद्या दे दे, धन ही दे दे
वृक्षासम तू देत रहा!१
सुख हे येते, दुःखहि येते
सुख ही जाते, दुःखहि जाते
स्थितप्रज्ञ तू सदा रहा!२
माझे जीवन सगळ्यांसाठी
संकटी राहिन सर्वांपाठी
नायकपण तू पहा पहा!३
अपशब्दांना नकोच थारा
मधुशब्दांचा खरा निवारा
उजाड माळहि फुलव पहा!४
गुणीजनांचे कौतुक करता
राष्ट्राची वाढते सुबत्ता
उत्तेजन तू देत रहा!५
भोग न जीवन त्यागच जीवन
सेवा करता सरते मीपण
तनमनधन देशास वहा!६
परिश्रमच ही खरी संपदा
सच्चरिताला कुठली विपदा
चंदनसम तू झिजत रहा!७
तुझ्या आतल्या रामा आळव
रामा आळव, रामा जागव
अंतरातला राम पहा!८
मन कोणाचे नच दुखवावे
दीनजनांचे अश्रु पुसावे
मेघासम तू बरस पहा!९
सज्जनरक्षण खलनिर्दालन
एकांती तत्त्वाचे चिंतन
ध्यानाला तू बसत रहा!१०
पक्वान्ने? छे फलाहार कर
जीवन देती निर्मळ निर्झर
जनी वनी तू स्वस्थ रहा!११
जीवनविद्या खरीच विद्या
कधी न सरते ऐसी विद्या
उत्साहाने शिकत रहा!१२
मनन करी तो मानव आहे
त्याच्या हृदयी राघव आहे
अनुभव घेई तूच पहा!१३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२८.०४.१९८७
No comments:
Post a Comment