Monday, July 27, 2026

प्रभातकाली श्रीगजानना ध्याना बसवावे!

स्वये जागता नित्य समर्था आम्हा जागवावे 
प्रभातकाली श्रीगजानना ध्याना बसवावे!ध्रु. 

श्रीगजानन जय गजानन कोणी जप करती 
गणगण जप हा शब्दाविणही कुणी ऐकताती
लीलांचे ते मर्म नेमके भक्ता उमगावे!१

अनेकातला एकपणाही ओळखता यावा 
पूर्वग्रह निवळावे सारे मिलाफ साधावा 
एकहृदय हो भारतजननी तथास्तु बोलावे!२

जसे बोलणे तसे वागणे जमणे ही भक्ती 
मागावेसे कधि न वाटणे विरक्ति म्हणताती 
हवेन‌को पण देवा अमुचे तुम्ही संपवावे!३ 

या देहाची काय तमा तो वरवरचा कपडा 
सिद्धयोगी तर रात्रंदिवसही पूर्णपणे उघडा 
प्रांजलपण ते कृतीत अमुच्या सदा दिसो यावे!४ 

शेगावी देहाने आला वा नाही आला 
पोथी वाचे श्रद्धेने तो मने पोचलेला 
आश्वासन दुर्बला निर्धना संजीवन व्हावे!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१४.०२.२००१

No comments:

Post a Comment