Tuesday, July 28, 2026

राधिका किती आर्जवे करी!

"अंतरातुनी ये बाहेरी 
मुरली धर तव करी-" 
"राधिका" किती आर्जवे करी!ध्रु.

नील मेघ गगनात पाहिला
श्यामल प्रेमल स्मरला स्मरला
गाली श्रावण सरी!१

तुझे सुदर्शन हारपवी मन
हारपवी मन भिजवी लोचन
दर्शन दे श्रीहरी!२

नंद‌कुमारा हे चितचोरा-
चंद्राचे हो स्मरण चकोरा 
सत्वर करुणा करी!३

नर-नारी हे भेद कायसे? 
सर्व विश्व हे वासुदेव से 
वेणुनाद मन धरी!४

जीवन अवघे गीता व्हावे
कोमल हळवे स्वर वदवावे 
स्मरण साधिका करी!५

दिक्-कालांचे बंध तोड रे 
उभा ठाकुनी मधुर हास रे 
विनवू कितिदा तरी?६

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२३.०७.१९८२

No comments:

Post a Comment