राम राम गाता गाता मन झाले बेभान
बोला जय जय जय हनुमान!ध्रु.
श्रीरामाचा पहिला दास, स्वामीसाठी श्वास नि श्वास
रामा जीव की प्राण!१
उंच उंच हे मन मग गेले प्राणांमध्ये नाम मिसळले
तेच तेच हनुमान!२
रविबिंबाला गगनी पाहुन असे वाटले घ्यावे कवळुन
ध्येयास्तव उड्डाण!३
गोटिबंद हे शरीर व्हावे, कार्य कराया समर्थ व्हावे
वज्रासम बलवान!४
ज्या त्या हृदयी वसला राम असे अनावर झाले नाम
नम्र तोच बलवान!५
पवनापासुन वेग घेतला श्वासातुन विश्वास लाभला
रघुनाथाची आण!६
दुःख नि चिंता भुते पळाली, कर्तव्याची स्फूर्ति मिळाली
बजरंगी वरदान!७
राम भजावा जीवेभावे नसे राम ते फेकुन द्यावे
भक्तीचे महिमान!८
श्रीरामाचा असा जिव्हाळा, सागर तर ओलांडुन गेला
अजिंक्य वीर महान!९
सीता छे आईच भेटली, सर अश्रूंची झरली गाली
ऋणानुबंध महान!१०
द्रोणागिरि ये सहज पेलता श्रीरामाचा शब्द झेलता
सज्जन गाती गान!११
नमस्कार सूर्यास घालता बालपणी ये तनी वज्रता
शक्तीचे महिमान!१२
श्रीरामाचा दूत बनावे श्रीरामाचे कार्य करावे
अनुसरणे हनुमान!१३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
No comments:
Post a Comment