Saturday, August 22, 2020

बाप्पा!

तू जागविशी आम्हा बाप्पा, आम्ही जागतो

प्रेमभराने आम्ही बाप्पा वंदन तुज  करतो 

मनास वळवून अंतरि बाप्पा तूच तूच शिकविशी 

आंघोळीला जाऊन या रे बाप्पा तू सुचविशी 

तनमन निर्मळ बघता बघता बाप्पा जादूगार! 

भल्या पहाटे यावे हिंडुन बाप्पा सुचवी छान 

बाप्पा म्हणजे मंगलमूर्ती गणपति हे पटले 

तजेलदार ही बाप्पा तुजसम होऊ या वाटले 

सवंगडी तू आम्हा मुलांचा बाप्पा हे नाते 

आधी, आता, नंतर बाप्पा कायमचे असते 

संगीताची गोडी बाप्पा गाण्यातुन लावली 

अक्षर घटवुन घेउन बाप्पा रेखिशी रांगोळी 

आनंद असतो हातामध्ये, बाप्पा मोदक वदे 

मनावरी ठेवा रे अंकुश बाप्पा कोण वदे?

चिखलातुन उगवले कमळ ते बाप्पा करि घेशी

दाह शमविती ऐशा दूर्वा बाप्पा शिरि धरशी 

ओंकाराचे प्रतीक बाप्पा त्यातुनही दिसशी 

ओवी, अभंग यातुन बाप्पा तू ऐकू येशी 

बाप्पा बोधहि ऐसा करशी समाजात मिसळा 

एक विसावा तू सगळ्यांचा बाप्पा हे कळले 

एकवीस ओळींचे स्तवनहि बाप्पा तू  लिहविले


रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

१७.८.२००४

No comments:

Post a Comment