श्रीराम आणि श्रीकृष्ण हे आपल्या अत्यंत जिव्हाळ्याचे आणि असीम श्रद्धेचे विषय आहेत आणि आपल्या जीवनाचे अविभाज्य भाग आहेत.
आत्मा हा जणु श्रीराम आहे तर व्यवहार श्रीकृष्ण..
-------------------------------------------------------------------
मम 'आत्मा' श्रीरामच गमला
व्यवहारी श्रीकृष्ण प्रकटला!ध्रु.
'राम कृष्ण हरि' वदे वैखरी
आनंदाच्या उसळत लहरी
इथे तिथे भगवंत भेटला!१
'सत्य' काय श्रीराम सुचवितो
'धर्म्य' काय श्रीकृष्ण घडवितो
कर्म वाटते यज्ञ मनाला!२
प्रभातकाली राम जागवी
आणि दिनांती कृष्ण जोजवी
दिवस सार्थकी असा लागला!३
'भाषण' सुमधुर श्रीरामाचे
'कुशल कर्म' ते श्रीकृष्णाचे
सुयोग सुंदर जुळला जुळला!४
परमार्थाची राम प्रेरणा
प्रपंचात श्रीकृष्ण चालना
दोहोंचाही मेळ साधला!५
मानव कैसा राम पहावा
कसा अग्रणी कृष्ण पहावा
'राम कृष्ण हरि' मंत्र मिळाला!६
'रामायण' घर मंदिर बनवी
जीवनविद्या गीता शिकवी
राम कृष्ण गुरु विश्वा सकला!७
अंतःकरणी तत्त्व स्फुरते
ते मुरता वर्तनी प्रकटते
मुक्तीची ही अशी शृंखला!८
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
९.८.१९९१
No comments:
Post a Comment