गोपाळकाला, गोपाळकाला, गोपाळकाला रंगला
"गोविंद, गोविंद, गोविंद" कल्लोळच उठला
"गोविंद, गोविंद, गोविंद" कल्लोळच उठला
गाठोड्यांचे आम्हास ओझे
हात मोकळे श्रीकृष्णाचे
गाईंमागे कसा गुराखी चाले मनमोकळा
किती खेळलो कळले नाही
किती हासलो भानच नाही
'मी माझे' चा विसरच पडला नकळत आम्हांला
दूध न पोचावे दुष्टाला
संधि न देणे उपभोगाला
कशी इंद्रिये रमवावी ती श्रीहरि शिकवी भजनाला
चला शिदोरी करा मोकळी
चला मने पण करा मोकळी
समरस व्हावे, खावे, गावे असा जागवा जिव्हाळा
श्रीकृष्णाला मधे घेतले
अति प्रेमाने तया भरवले
आत्मानंदहि असाच असतो कळले कळले आम्हाला
विभक्त होण्या अवसर नाही
कपट करावे मनात नाही
देवापासुन काय दडतसे? देवच हाती सापडला
हरि घुमवितो कशी बासरी
अंगांगावर उठे शिरशिरी
गोधनही ते येते धावुन हाक पोचली आत्म्याला
सुखदुःखांनी मिश्रित जीवन
विविध रसांचे तैसे भोजन
चवीचवीने सेवन करता काला कृष्णाचा कळला
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२५.८.१९८९
No comments:
Post a Comment