मंगलमूर्ती मोरया
गणपति बाप्पा मोरया!ध्रु.
गणपति बाप्पा मोरया!ध्रु.
मूर्ती आपली मातीची
जोड लाभली तेजाची
जो तो पडताहे पाया!१
लुकलुकती इवले डोळे
तुम्ही जाणता मनातले
कसे जगावे शिकवा या!२
उपासना ती सूर्याची
सहजसाधना योगाची
स्थैर्य मनाला देण्या या!३
अंकुश जर का मनावर
प्रसन्न होतो रमावर
गानकला शिकवाया या!४
शस्त्रे धरता हाती ती
अबला ही सबला होती
युद्धकला देण्याला या!५
शुभ चिंतावे अशुभ पळे
अवघड विषयहि सहज कळे
समरसता शिकवाया या!६
शेती उद्यम व्यापार
दक्ष त्यामधे असणार
वैभवशिखरी न्या हो न्या!७
बाप्पा तुम्ही सगळ्यांचे
बाल युवा अन् वृद्धांचे
घरात अपुल्या या हो या!८
गणेश म्हणजे आनंद
युगायुगांचा संबंध
ते नाते जपण्याला या!९
विवेकशुंडा आत वळे
आनंदाचा उगम कळे
मना अंतरी नेण्या या!१०
संघटनेचा द्या मंत्र
प्रेमाचे बळकट सूत्र
ऐक्यभाव फुलवाया या!११
प्रतिवर्षी आपण येता
वाढविता ही आतुरता
आकर्षण शिकवाया या!१२
काम असे करवुन घ्यावे
जरा न आपण गुंतावे
अनासक्त करण्याला या!१३
नित्य आरती रंगतसे
उधाण उत्साहास असे
उल्हासा वाढविण्या या!१४
पूर्वनियोजन कामाचे
रहस्य ऐसे सुयशाचे
वेळापत्रक शिकवा या!१५
कणाकणाने रास बने
क्षणाक्षणाने युगहि बने
सातत्यहि ते द्या हो द्या!१६
येताना वा जाताना
हसवायाचे सगळ्यांना
तत्त्व खोलवर रुजवा या!१७
तुम्हासारखा अनंत कोण
तुम्हासारखा दाता कोण
अथर्वशीर्षा शिकवा या!१८
काळाला मूषक केले
वाहन उपयोगी ठरले
सदुपयोग वेळेचा द्या!१९
पाची तत्त्वांचा मेळ
किती रंगला हा खेळ
तीच खिलाडूवृत्ती द्या!२०
जे वाचावे समजावे
कृतीत ते ते उतरावे
श्रीरामाला संगे घ्या!२१
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गणेश चतुर्थी १९९६
No comments:
Post a Comment